मुंबई, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। हिंदुजा ग्रुपचा एक भाग असलेल्या हिंदुजा रिन्यूएबल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने (एचआरईपीएल) दीपक ठाकूर यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 1 ऑक्टोबरपासून नियुक्ती केली आहे. त्यांना अक्षय ऊर्जा, पायाभूत सुविधा, औद्योगिक उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमध्ये तीन दशकांहून अधिक काळ वैविध्यपूर्ण कामाचा अनुभव आहे.
दीपक यांनी महिंद्रा ग्रुप, रिलायन्स, स्टर्लिंग अँड विल्सन, एल अँड टी, हनीवेल आणि थर्मॅक्स या अनेक संस्थांमध्ये नेतृत्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत. त्यांचा अनुभव सौर, पवन, स्टोरेज आणि हायब्रिड प्रणालींमध्ये प्रकल्प विकास, EPC, O&M, अपस्ट्रीम तंत्रज्ञान, उत्पादन आणि InvITs द्वारे मालमत्ता पुनर्वापर या सर्व अक्षय ऊर्जा मूल्य साखळीमध्ये विस्तारलेला आहे. तर सुमित पांडे यांचे उत्तराधिकारी असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दीपक यांच्या नियुक्तीवर भाष्य करताना एचआरईपीएलचे अध्यक्ष शोम हिंदुजा म्हणाले, “अक्षय ऊर्जा क्षेत्रात आघाडीची कंपनी होण्याच्या आमच्या आकांक्षेवर आम्ही काम करत असताना दीपक यांचा अनुभव आणि नेतृत्व आमच्या आगामी प्रवासात महत्त्वपूर्ण ठरेल. मंडळावर दीपक आमच्यासोबत असल्याचा आम्हाला आनंद आहे आणि हिंदुजा रिन्यूएबल्स एकत्रितपणे उभारण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तसेच मी सुमित यांचे हिंदुजा रिन्यूएबल्ससाठीच्या मूलभूत योगदानाबद्दल आभार मानतो आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.”
दीपक ठाकूर म्हणाले, “हिंदुजा ग्रुपचा भाग होणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. समूहाची अक्षय ऊर्जेसाठीची सखोल बांधिलकी भारताच्या ऊर्जा परिवर्तनाशी घट्टपणे जोडलेली आहे आणि या प्रभावी आणि वाढीच्या प्रवासाचा भाग होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वतता या क्षेत्राचे खंदे समर्थक असलेल्या दीपक यांनी 2009 मध्ये नॅशनल सोलर थर्मल पॉलिसी तयार करण्यात योगदान दिले. त्यामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा दृष्टीकोनाची पायाभरणी करण्यात मदत झाली. त्यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील बॅचलर पदवी आणि सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule