स्टॉकहोम, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाची सोमवारी(दि.१३) घोषणा झाली आहे. यंदाचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जोएल मोकिर (यूएसए), पीटर हॉविट (यूएसए) आणि फिलिप अघियन (यूके) यांना प्रदान करण्यात आले आहे.
नोबेल समितीने म्हटले आहे की, या अर्थशास्त्रज्ञांनी नवोपक्रमामुळे आर्थिक विकास कसा होतो हे दाखवून दिले आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलते आणि आपल्या सर्वांवर परिणाम करते. नवीन उत्पादने आणि उत्पादन पद्धती सतत जुन्या उत्पादनांची जागा घेतात आणि ही प्रक्रिया कधीही संपत नाही. हा शाश्वत आर्थिक विकासाचा आधार आहे, ज्यामुळे जगभरातील लोकांचे जीवनमान, आरोग्य आणि राहणीमान सुधारते.
विजेत्यांना ११ दशलक्ष स्वीडिश क्रोना (₹१०.३ कोटी), सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र मिळेल. हे पुरस्कार १० डिसेंबर रोजी स्टॉकहोममध्ये प्रदान केले जातील.
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाला औपचारिकरीत्या ‘अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ अर्थशास्त्रातील स्वीडनच्या सेंट्रल बँकेचा पुरस्कार’ असे म्हणतात. स्वीडनच्या सेंट्रल बँकेने 1968 मध्ये हा पुरस्कार सुरू केला होता.मागील आठवड्यातच वैद्यकीय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांतील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode