श्रीनगर, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कराची कारवाई अजूनही सुरूच आहे, कारण या भागात अजूनही काही दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
घुसखोरीच्या प्रयत्नाची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. भारत-पाकिस्तान सीमेजवळील जंगलात १३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून ही कारवाई सुरू आहे. दहशतवाद्यांनी या भागातून घुसखोरीचा प्रयत्न केला होता, परंतु सुरक्षा दलांनी हा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय लष्कराने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
अलिकडच्या काळात सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया पुन्हा वाढल्या आहेत. संयुक्त मोहिमेदरम्यान, लष्कर आणि पोलिसांनी वारसन परिसरातील ब्रिजथोर जंगलात दहशतवाद्यांच्या एका ठिकाणाचा पर्दाफाश केला होता. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी दोन एके सिरीज रायफल्स, चार रॉकेट लाँचर्स, मोठ्या प्रमाणावर गोळाबारूद आणि इतर युद्धसामग्री जप्त केली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील भारतीय लष्कराच्या चिनार कोरला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू करण्यात आली होती.या परिसरात लपलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अजूनही शोध मोहीम सुरू आहे.
यापूर्वी कुलगाम जिल्ह्यातील गुड्डर जंगलातही लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्या ऑपरेशनमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता, तर दोन जवान शहीद झाले होते. मारले गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख अमीर अहमद दार अशी झाली आहे, जो शोपियानचा रहिवासी आहे. तसेच तो लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता आणि सप्टेंबर २०२३ पासून यामध्ये सक्रिय होता. पहलगाम हल्ल्यानंतर सोडण्यात आलेल्या १४ वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode