अबू धाबी, १५ ऑक्टोबर (हिं.स.)अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा २०० धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली. हा अफगाणिस्तानचा सलग पाचवा एकदिवसीय मालिका विजय आहे. टी-२० मालिका ०-३ ने गमावल्यानंतर, अफगाणिस्तान संघाने जोरदार पुनरागमन केले आणि एकदिवसीय मालिकेत बांगलादेशचा पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ५० षटकांत ९ बाद २९३ धावा केल्या. इब्राहिम झद्रानने ९५ धावांची शानदार खेळी केली, तर मोहम्मद नबीने ३७ चेंडूत ६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ २७.१ षटकांत ९३ धावांवर ऑलआउट झाला. बिलाल सामीने भेदक गोलंदाजी करत ३३ धावांत ५ विकेट्स घेतल्या. तर राशिद खानने ३ विकेट्स घेतल्या.रहमानउल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी अफगाणिस्तानच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. त्यांनी १५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. गुरबाज ४० धावांवर बाद झाला, तर इब्राहिम ९५ धावांवर बाद झाला. नबीने शेवटच्या षटकांत स्फोटक फलंदाजी केली आणि केवळ १४ चेंडूत ४५ धावा करून डावाला मजबूत धावसंख्या गाठून दिली.लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. नवव्या षटकात मोहम्मद नैम बाद झाला आणि त्यानंतर विकेट्सची मालिका सुरू झाली. ७०/३ पासून, संघ ८१/८ वर घसरला. फक्त सैफ हसन ४३ धावा करू शकला. इतर सर्व फलंदाज दुहेरी आकडी गाठू शकले नाहीत.
संक्षिप्त धावफलक: अफगाणिस्तान – २९३/९ (इब्राहिम झद्रान ९५, मोहम्मद नबी ६२, सैफ हसन ३/६, तन्वीर इस्लाम २/४६)
बांगलादेश – ९३ (सैफ हसन ४३; बिलाल सामी ५/३३, रशीद खान ३/१२)
निकाल: अफगाणिस्तान २०० धावांनी विजयी
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे