अमरावती, 15 ऑक्टोबर, (हिं.स.) - भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, श्रद्धा उदावंत, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, अधीक्षक निलेश खटके, तहसिलदार रूपेश खंडारे आदी उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुषंगाने जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. सुरज मडावी यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी