अमरावती, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती महानगरपालिका इमारत नेहरू मैदानात बांधून महानगरपालिकेच्या मूळ जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात येणार असल्याच्या निर्णयाचे वृत्त प्रकाशित झाल्यावर भाजपाचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी मैदाने वाचवण्यात यावी ही भाजपाची अधिकृत भूमिका जाहीर केली. दुसऱ्याच दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेहरू मैदानात कुठलेही बांधकाम होणार नाही अशी भूमिकाच नव्हे तर ठोस निर्णय जाहीर केला. या विषयाला धरून काँग्रेसने केविलवाणी आदळआपट थांबवावी असा सल्ला भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी काँग्रेसला दिला आहे.
'फेक नरेटिव्ह' पसरवण्याचा रोग राहुल गांधी यांना जडला आहे. त्या विकृत रोगाची लागण अमरावती शहर काँग्रेसला लागल्याचे दिसून येत आहे. भाजपावर आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सल्ले देणारे व पत्रपरिषदेत दिसलेले बहुतांश चेहरे आगामी मनपा निवडणुकीत पराभवाचे सावट दिसू लागताच कालपर्यंत 'कोणी तिकीट देता का तिकीट' करत दारोदार फिरत होते. सगळ्यांनी दरवाजे बंद ठेवल्यावर पुन्हा परत त्यांच्या डुबत्या जहाजात त्यांना नाईलाजाने बसावे लागते आहे. भाजपाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाच प्रश्न विचारावा, असे काँग्रेसने म्हटले आहे. पालकमंत्र्याना प्रश्न विचारण्याची गरजच नाही. या प्रकरणी पालकमंत्र्यांची व भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. उलट पत्रकार परिषदेत दिसलेल्या चेहऱयांनी आपल्याच नेत्यांना प्रश्न विचारावे. या प्रश्नांची उत्तरे जनहितासाठी आवश्यक आहेत. नेहरू मैदानावर कचऱ्याचा ढीग लावणारा अमरावतीचा कचरा सम्राट कोण ? या कचरा सेठ वर कोणाची कृपा आहे, कोणाचा वरदहस्त आहे ? मनपाच्या ताब्यातील जागांवर व्यापारी संकुल बांधून डल्ला मारणारा कंपू शहरात कोण चालवतो ? या भूमाफिया कंपूला कोणाचा आशीर्वाद आहे ? मनपाच्या मालकीच्या जनहितासाठी बांधलेल्या वास्तूंवर कोणाची कमाई सुरू आहे ? नेहरू मैदानावर इमारत बांधावी यासाठी छुपेपणाने कामाला लागलेला कंपू कोणाचा ? कचरा वहनाच्या नव्या कंत्राटा वर काँग्रेसचा आरोप कोणाचे हित साधण्यासाठी ? अशी असंख्य प्रश्नांची मालिका आहे. एकीकडे कचरा सम्राट, मनपा जागांवर डल्लामारू भूमाफिया कंपू पोसायचा आणि दुसरीकडे जिवाच्या आकांताने शहर वाचवा, शहर वाचवा ओरोळ्या स्वतःच मारायच्या असा काँग्रेसचा दुटप्पी चेहरा आहे. परिणामी आम्हाला प्रश्न विचारण्याचा सल्ला देण्यापेक्षा काँग्रेसने आपल्या नेत्यांना प्रश्न विचारावे. वारंवार 'फेक नरेटिव्ह' कामी येत नसतो हे गेल्या विधानसभेच्या निकालानंतरही काँग्रेसला समजले नाही, याचे आश्चर्य आहे ! विकासाच्या गोंडस नावाखाली अमरावती शहरातील मैदाने गिळंकृत करण्याच्या कृतीला भारतीय जनता पार्टीचा तीव्र विरोध आहे. नेहरु मैदानाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता ते आणि शहरातील इतर मैदाने देखील कायम ठेवण्यात यावी, अशी भाजपाची स्पष्ट भूमिका आहे. भाजपाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेला भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, किरण पातूरकर, प्रा. रवींद्र खांडेकर, प्रामुख्याने उपस्थित होते. नेहरू मैदानाला ऐतिहासिक महत्व आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात याच मैदानात अमरावतीकरांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. या मैदानाचे सौंदर्यीकरण व्हावे. इथे असलेली शाळेची इमारत 'हेरिटेज' आहे. त्या इमारतीला सजवून त्यावर विविध प्रकारचे लाईट्स सोडून त्या इमारतीत अमरावतीचा इतिहास दर्शवणारे संग्रहालय व्हावे. अमरावती शहराच्या मध्यभागी छोटे का असेना एकमेव मैदान शिल्लक आहे. त्या मैदानाशी अमरावतीकरांचे भावनिक नाते जुळले आहे. अतिशय दाट वस्तीच्या मुंबईसारख्या शहरात देखील मैदानांचे संवर्धन आणि जतन करण्यात येते. अमरावतीत देखील याचप्रकारचा विचार करण्यात यावा. नेहरु मैदान, दसरा मैदान, सायन्सकोर मैदान अशा सर्व मैदानांना ऐतिहासिक महत्व असून त्यांचे जतन करण्यात येणार अशा ठाम भूमिकेचा पुनरुच्चार भाजपाच्या वतीने करण्यात आला. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी