जळगाव, 15 ऑक्टोबर (हिं.स.) इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण योजना या योजनेचा लाभ धनगर समाजातील (भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील) विद्यार्थ्यांना
मिळणार आहे. या योजनेद्वारे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शहरांतील नामांकित इंग्रजी माध्यम
निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी
उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील दोन नामांकित इंग्रजी माध्यम निवासी शाळांमध्ये प्रवेशाची व्यवस्था
करण्यात आली आहे. त्यामध्ये बियानी पब्लिक स्कूल, भुसावळ (ता. भुसावळ) आणि श्री. सुरेशचंद बी.
संघवी इंटरनॅशनल स्कूल, उन्त्राण (ता. एरंडोल) या शाळांचा समावेश आहे. या दोन्ही निवासी शाळांमध्ये
रिक्त जागांसाठी पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी धनगर समाजाचा (भटक्या जमाती ‘क’) असणे आवश्यक आहे.
तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न कमाल एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. इयत्ता पहिलीत
प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ३१ डिसेंबर २०२५ रोजी किमान सहा वर्षे पूर्ण असावे. तर इयत्ता दुसरी ते
आठवी पर्यंतच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड
प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रियेत स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार नसून, ज्या शहरात शाळा आहे त्या ठिकाणचे
रहिवासी नसलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. विशेषतः विधवा, घटस्फोटीत, निराधार, परित्यक्ता
महिला किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांची निवड प्राधान्याने केली जाणार
आहे. जर मान्यताप्राप्त क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले, तर शासन निर्णय दिनांक ४ सप्टेंबर २०१९ आणि ५
मार्च २०२४ च्या अटींनुसार कार्यवाही करण्यात येईल.
प्रवेशासाठीचा अर्ज https://jalgaon.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://q.me-
qr.com/yEJs5yez या लिंकवर उपलब्ध आहे. इच्छुक पालकांनी अर्ज परिपूर्ण भरून आवश्यक
कागदपत्रांसह दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर करावा.
अर्ज प्रत्यक्षपणे सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव या कार्यालयात सादर करावेत व योजनेबाबत अधिक
माहिती किंवा मार्गदर्शनासाठी संबंधितांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क
साधावा, असे आवाहन सहायक संचालक, योगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर