जळगाव, 15 ऑक्टोबर, (हिं.स.) - धरणात पोहोण्याचा मोह तरुणाच्या जीवावर बेतला आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील नेव्हरे धरणामध्ये पोहोण्यासाठी गेलेल्या ३१ वर्षीय तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि १५ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. शरद राजाराम सुने (बारी, वय ३१, रा. शिरसोली प्र. न.) असे मयत तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
शिरसोली प्र. न. येथील नेव्हरे शिवारातील नेव्हरे धरणावर शरद सुने हा गावातील त्याचे मित्र भिका वसंत शिंपी (वय ४५) आणि अशोक सखाराम भिल (वय ५०) यांच्यासोबत गेला होता. यावेळी पोहत असताना पाण्याचा नेमका अंदाज न आल्याने शरद पाण्याच्या खोलवर गेला आणि बुडायला लागला.हा प्रकार पाहून घाबरलेल्या भिका शिंपी आणि अशोक भिल यांनी तत्काळ गावाकडे धाव घेतली. त्यांनी घडलेली घटना पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळवली. बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ तत्काळ धरणाच्या दिशेने धावले. त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने शरदला पाण्यातून बाहेर काढले.शरदला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केलेशरद हा एकुलता एक मुलगा होता आणि मजुरी करून आपल्या आई-वडिलांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. कुटुंबाचा तो आधारस्तंभ होता. त्याच्या अचानक जाण्याने सुने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर