पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीनिमित्तच्या खरेदीला लक्ष्य करून केल्या जाणाऱ्या सायबर फसवणुकीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार यासाठी मोठ्या प्रमाणात कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दिवाळीची ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला क्विक हील टेक्नॉलॉजीजच्या सर्वेक्षण अहवालात देण्यात आला आहे.
क्विक हील टेक्नॉलॉजीजच्या सेक्युराइट लॅब्स या मालवेअर विश्लेषण केंद्राने हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान ई-कॉमर्स मंचावरील विक्रीने ९० हजार कोटी रूपयांचा टप्पा गाठला होता. त्या वेळी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) दररोज १३ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री हाताळली केली. डिजिटल व्यवहारांमधील या वाढीमुळे सायबर गुन्ह्यांमध्ये दिवाळीच्या काळात वाढ होते. सणासुदीदरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी सवलतींसह इतर योजनांच्या माध्यमातून आकर्षित करणाऱ्या संदेशांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यापैकी अनेक संदेश हे कृत्रिम गरज निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना योग्य पडताळणीशिवाय फसवणूक करणाऱ्या लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडण्यासाठी तयार करण्यात आलेले असतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु