लातूरला प्रथमच जलतरण राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धां
लातूर, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने २०२५-२६ या वर्षी आयोजित राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांपैकी जलतरण स्पर्धेचे आयोजन प्रथमच लातूर जिल्ह्यात करण्यात आले आहे. लातूर जिल्हा क्रीडा परिषद आणि शिवछत्रपत
लातूरला प्रथमच जलतरण राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धां


लातूर, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने २०२५-२६ या वर्षी आयोजित राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांपैकी जलतरण स्पर्धेचे आयोजन प्रथमच लातूर जिल्ह्यात करण्यात आले आहे. लातूर जिल्हा क्रीडा परिषद आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त) यांच्यावतीने या स्पर्धा १६ ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरंगुळ रेल्वे स्टेशन जवळील राजर्षी शाहू महाविद्यालय क्रीडा संकुल येथे होणार आहेत.

या स्पर्धेत अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ या ९ विभागांतून १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींसह सुमारे १ हजार खेळाडू, संघव्यवस्थापक व तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी जलतरण तलाव सज्ज करण्यात आला असून, खेळाडूंची निवास व्यवस्था संकुलातील वसतीगृह व सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आली असून, शिवछत्रपती शिक्षण संस्था व महाविद्यालयाचे सर्व प्रशासन व क्रीडा विभाग यांच्याकडून यशस्वी आयोजनासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. स्पर्धेत पुणे विभागातील आंतरराष्ट्रीय खेळाडू त्विशा दिक्षीत, कोल्हापूर विभागातील राष्ट्रीय पदकविजेता अथर्वराज पाटील, मुंबई विभागातील साईमिरा मेहरोत्रा व शिवछत्रपती क्रीडापीठातील चैतन्य शिंदे, श्रीलेखा पारिख यांसह अनेक दिग्गज सहभागी होत आहेत.

स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता जलतरण तलावावर शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते होईल. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमात संस्थेचे सचिव डॉ. अनिरुद्ध जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी व प्र. उपसंचालक महादेव कसगावडे उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेमुळे लातूर जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची कौशल्ये जवळून पाहण्याची संधी मिळेल, असे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे व जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी सांगितले. राज्यभरातील खेळाडूंचे लातूर शहरातील नागरिकांनी स्वागत करावे तसेच उदयोन्मुख खेळाडू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande