दुबई, १५ ऑक्टोबर (हिं.स.)अबू धाबीमध्ये बांगलादेशविरुद्ध संघाच्या ३-० अशा शानदार विजयात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अफगाणिस्तानचा फिरकी गौलंदाज राशिद खानने आयसीसी एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत पुन्हा एकदा नंबर १ स्थान पटकावले आहे. राशिदने या मालिकेत एकूण ११ विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये दुसऱ्या सामन्यात घेतलेल्या शानदार 5 विकेट्सचाही समावेश आहे. या कामगिरीमुळे तो ७१० रेटिंग गुणांसह पाच स्थानांनी अव्वल स्थानावर पोहोचला आहे. जो दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज (६८० गुण) पेक्षा ३० गुणांनी पुढे आहे. राशिद पहिल्यांदा सप्टेंबर २०१८ मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता आणि शेवटचा नोव्हेंबर २०२४ मध्ये हे स्थान राखले होते. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज अझमतुल्लाह उमरझाईनेही चांगली कामगिरी करत 7 विकेट्स घेत १९ स्थानांनी झेप घेत २१ व्या स्थानावर पोहोचला. बांगलादेशचा मेहदी हसन मिराज (चार स्थानांनी, २४ व्या स्थानाने) आणि तन्झिम हसन सकीब (२४ स्थानांनी, ६७ व्या स्थानाने) यांनीही आपल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रानने एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान मिळवले. त्याने मालिकेत सर्वाधिक २१३ धावा केल्या आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचे रेटिंग अफगाण फलंदाजांमध्ये आतापर्यंतचे सर्वोच्च आहे, त्याने रहमानुल्ला गुरबाजच्या ६८६ गुणांना मागे टाकले. रहमानुल्ला दोन स्थानांनी पुढे सरकून १६ व्या स्थानावर पोहोचला आहे, तर बांगलादेशचा तौहिद हृदयॉय (४२ व्या स्थानावर) आणि मोहम्मद नबी (५० व्या स्थानावर) यांनीही त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. अजमतुल्ला आणि राशिद यांनीही अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा केली आहे. अजमतुल्ला पुन्हा अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू क्रिकेटपटू बनला आहे. तर राशिद चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम १४ वे स्थान मिळवले आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात आठ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजचा जोमेल वॉरिकन आणि रोस्टन चेस यांनीही क्रमवारीत अनुक्रमे ३० व्या आणि ५७ व्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसऱ्या कसोटी डावात १७५ धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालने फलंदाजी क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले आहे. केएल राहुलनेही दोन स्थानांनी प्रगती करत ३३ व्या स्थानावर झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजचा शाई होप (६६ व्या स्थानावर) आणि जॉन कॅम्पबेल (६८ व्या स्थानावर) यांच्या क्रमवारीतही सुधारणा दिसून आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे