रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं. स.) : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे वाङ्मय पुरस्कार वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात गझलकार प्रा. कैलास गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कार विजेते श्रीकांत पाटील, अविनाश बापट, प्रा. सुहास बारटक्के, विजय जोशी, धनाजी घोरपडे आणि वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य द्वारकानाथ शेंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्याध्यक्ष इंगवले यांनी प्रास्ताविक केले. ज्या मान्यवर साहित्यिकांच्या स्मृतिप्रिीत्यर्थ हे पुरस्कार दिले जातात त्या कवी आनंद तथा वि. ल. बर्वे तसेच कवी माधव तथा माधव केशव काटदरे आणि कविवर्य द्वारकानाथ शेंडे यांची आणि त्यांच्या साहित्याची माहिती त्यांनी दिली. वाचनालय कोणाचीही जात, धर्म, प्रांत, गट, तट, पक्ष न पाहता साहित्याचा कस पाहून एका स्वतंत्र समितीमार्फत हे पुरस्कार जाहीर करते, असे ते म्हणाले.
प्रा. गांधी यांचा परिचय वाचनालयाचे संचालक अनिल धोंड्ये यांनी करून दिला. कैलास गांधी यांना कार्याध्यक्ष इंगवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यानंतर लेखक धनाजी घोरपडे यांच्या 'जामिनावर सुटलेला काळा घोडा' या कवितासंग्रहाची संचालक राष्ट्रपाल सावंत यांनी माहिती सांगितली. धनाजी घोरपडे यांना कविवर्य द्वारकानाथ शेंडे 'मृदंगी' पुरस्काराने सन्मानित केले. घोरपडे यांनी आपल्या मनोगतामध्ये आजचा पुरस्कार पद्मश्री पुरस्कारासारखाच वाटतो. आपल्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले.
दुसरा पुरस्कार द्वारकानाथ शेंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजय जोशी यांच्या 'वृत्तबद्ध कविता ते गझल तंत्र आणि मंत्र' या पुस्तकाला देण्यात आला. या पुस्तकाची माहिती लेखक संतोष गोणबरे यांनी सांगितली. विजय जोशी यांना कविवर्य द्वारकानाथ शेंडे ‘समीक्षा’ पुरस्काराने सन्मानित केले. जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना निरपेक्षपणे आणि निष्पक्षपातीपणे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा आदराने उल्लेख करून वाचनालयाचे आभार मानले.
प्रा. सुहास बारटक्के यांच्या कथाविविधा संग्रहाची माहिती संचालिका स्वरदा कुलकर्णी यांनी दिली. सुहास बारटक्के यांना ‘कवी माधव’ पुरस्काराने सन्मानित केले गेले. आपल्या मनोगतामध्ये बारटक्के यांनी गावामधील ज्या वाचनालयाने लिहायला, वाचायला शिकवले अशा सांस्कृतिक केंद्राने दिलेला हा सन्मान माझ्यासाठी सर्वांत मोठा असल्याचे सांगितले.
प्रा. अविनाश बापट (देवगड) यांची आणि त्यांच्या 'शापित हवेली' या कथासंग्रहाची माहिती संचालक संजय शिंदे यांनी करून दिली. यातील सर्व कथा मालवणी भाषेत असल्याचे सांगून काही कथांची थोडक्यात माहिती दिली.
अविनाश बापट यांना कवी आनंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री. बापट यांनी आज आपल्या आयुष्यातील कपिलाषष्ठीचा योग असल्याचे सांगितले.
कादंबरीकार श्रीकांत पाटील (कोल्हापूर) यांची आणि त्यांच्या ‘ऊसकोंडी’ कादंबरीची माहिती प्राध्यापिका अंजली बर्वे यांनी वर्तमानातील उदाहरणे देऊन विशद केली. श्रीकांत पाटील यांना द्वारकानाथ शेंडे ‘मनबोली‘ पुरस्काराने सन्मानित केले. आपल्या माझ्या आयुष्यातील हा सर्वांत मोठा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. गांधी यांनी शेरोशायरी ऐकवल्या. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या साहित्याचा आणि वाचनालयाच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा दामले यांनी केले, तर आभार विनायक ओक यांनी मानले. याकार्यक्रमाला दिशा दाभोळकर, सुनील टेरवकर, कवी सुदेश मालवणकर, कवी सुनील कदम, संचालक, सभासद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी