जन्मशताब्दी साहित्य संमेलनाचे शानदार उदघाटन
नाशिक, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : माणसाच्या उत्थानासाठी लिहिलेली नवी 'सनद'...संघर्षाचे ठिकाण बनलेला रस्त्याला फूटपाथला बनवलेलं 'माझे विद्यापीठ'. तसेच माणसाला जोडून घेत पुढे नेणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जनशताब्दीनिमित्त झालेल्या साहित्य संमेलनाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री शिंदे यांनी सुर्वेंनी समाजप्रबोधन करत गरिबांना जगण्याचा बळ साहित्यातून दिलं, असे गौरवोदगार काढले. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे अध्यक्षस्थानी होते.
विचार पुढे घेऊन जात गरिबांसाठी लेखणी वापरली पाहिजे असे नारायण सुर्वे यांनी सांगितले आहे, असेही शिंदे यांनी अधोरेखित केले. सिडकोतील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयात सुर्वे यांच्या प्रतिमेला श्री. शिंदे यांनी अभिवादन केले. 'झेप' या सुर्वेंच्या कवितेचे वाचन त्यांनी केले. स्वागताध्यक्ष डॉ. विशाल जाधव, वाचनालयाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे उपस्थित होते.
सुर्वेंच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्रातील पहिला कार्यक्रम नाशिक मध्ये होत असल्याचा आनंदभाव शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच देश कृतीशील राहण्यासाठी लेखन करणारे डॉ. कसबे, कांबळे इथे राहतात. आणखी काय हवंय, असे सांगून शिंदे म्हणाले की, रस्त्यावर सापडलेले सुर्वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले याचा मला अधिक आनंद आहे. मुळातच, सुर्वे विचारांचा वारसा साहित्यातून घेऊन जगभर पोहोचले. कष्ट उपसत त्यांनी उदरनिर्वाह केला. पुढे मास्तर म्हणून त्यांनी नाव मिळवले. त्यांच्या विचारांवर गिरणगावचा, तिथला लोकांच्या जगण्याचा, कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव होता. सगळं हातात आहे असे समजावून त्यांनी विचार पोटतिडकीने साहित्यातून मांडला.
वाचकांच्या जाणिवा बदलाव्यात, विकास व्हावा यासाठी साहित्यिकांनी एकत्र यावे म्हणून नारायण सुर्वे साहित्य संमेलन होत आहे असे सांगून डॉ. कसबे म्हणाले की, नारायण सुर्वेंनी साहित्य निर्मितीतून माणसांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. तसेच मार्क्सवाद मराठीतून मांडणारे सुर्वे आणि क्रांतिकारी साहित्यिक बाबूराव बागूल हे सशक्त दुवे आहेत.
सध्यस्थितीत संपूर्ण जग एका दरीच्या काठावर उभे आहे. भांडवलशाही लोकशाहीच्या माध्यमातून वाढत गेली. मात्र आता भांडवलशाही आणि लोकशाही यांच्यात अंतर वाढत आहे. भांडवलशाही जिवंत राहण्यासाठी जगभरातील विचारवंत विचार करत आहेत. लोकशाही समाजवादाकडे जाण्यात घेऊन जाण्यासाठी निवडणुका मार्ग आहे. पण भांडवलशाही अर्थव्यवस्था टिकवण्याची खात्री नाही. भांडवलशाहीतील आंतर विरोधामुळे दुसरे महायुद्ध झाल्याचे आपण पाहिले. अशा परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि काल मार्क्स यांनी पर्याय सांगितला. निसर्ग आणि माणसाने एक व्हावे. प्रश्न विचारत उत्तरे शोधता येईल, असेही डॉ. कसबे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV