चंद्रपूर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।
परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या नॅशनल ओव्हरसिज स्कॉलरशिप निवडीसाठी सन 2025-26 करिता कमी उत्पन्न असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या जमाती, भुमीहीन शेतमजूर व पारंपारिक कारागीर श्रेणीतील कुटूंबातील पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
योजनेचा उद्देश : नॅशनल ओव्हरसिज स्कॉलरशिप ही केंद्र सरकारची योजना असून अनुसूचित जातीं मधील कमी उत्पत्र असलेल्या कुटूंबातील विद्यार्थ्यांना, विमुक्त भटक्या आणि भटक्या जमाती, भूमिहीन शेती कामगार आणि पारंपारिक कारागीर श्रेणीतील कुटूंबातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेऊन पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी. अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत करण्यासाठी आहे.
या प्रवर्गासाठी आहे योजना : अ) अनुसूचित जाती - शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या 115, ब) विमुक्त भटक्या आणि भटक्या जमाती - शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या 6, क) भूमिहीन शेती कामगार आणि पारंपारिक कारागीर श्रेणीतील कुटूंबातील विद्यार्थी संख्या - 4
पात्रतेचे निकष : 1. विद्यार्थी उपरोक्त अ, ब, क घटकातील असावा, 2. विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा, 3. विद्यार्थ्याचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे, 4. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे, 5. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक, 6.परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत 500 च्या आत असावी.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप : विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम, (अ) आरोग्य विमा आणि (ब) व्हिसा शुल्क या बाबी परदेश शिष्यवृत्तीधारकांसाठी अनुज्ञेय असतील. विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी यु. एस. डॉलर 15400 तर यु.के. साठी जी.बी. पौंड 9900 इतका अदा करण्यात येतो. विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यु.एस. ए. व इतर देशांसाठी यु. एस. डॉलर, 1500 तर यु. के. साठी जी.बी. पाँड 1100 इतके देण्यात येतात. यामध्ये पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चाचा समावेश आहे. विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय असेल, असे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव