नाशिक, 15 ऑक्टोबर (हिं.स.) - सातपूर येथील गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या बेकायदेशीर घरावर महापालिका हातोडा टाकून जमिनदोस्त करणार आहे.
गेल्या शुक्रवारी नाशिक महानगरपालिकेच्या पथकाने पाहणी करत हे काम अनधिकृतपणे नंदिनी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधल्याचे समोर आले होते. त्यानंतर पाच दिवसांत याप्रकरणी प्रकाश लोंढे यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही बांधकामासंदर्भात कागदपत्रे सादर करण्याची नोटीस दिली होती, मात्र या पाच दिवसात लोंढे यांच्याकडून कोणीही समोर न आल्याने नाशिक महापालिका प्रशासनाकडून कांबळेवाडी येथील बेकायदेशीर इमारतीवर कारवाई केली जाणार आहे. सध्या प्रकाश लोंढे व त्यांचा मुलगा दीपक लोंढे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर दुसरा मुलगा संशयित भूषण लोंढे अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. लोंढे यांनी सातपूर शिवारातील कांबळेवाडी येथील आयटीआय पुलाजवळील नंदिनी नदीच्या पात्रालगत बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नगरनियोजन विभागाने नोटीस बजावत त्यांना पाच दिवसांच्या आत बाजू मांडण्याची मुदत दिली होती. तसेच पालिकेला समाधानकारक उत्तर न मिळाल्यास याप्रकरणी लोंढे पितापुत्रांवर गुन्हा दाखल करुन हे बांधकाम जमिनदोस्त करण्याचाही इशारा दिला होता. त्यानुसार आता हे बांधकाम पाडले जाणार असून व त्याचा खर्च लोंढे यांच्याकडून वसूल केला जाणार आहे.
नाशिक महापालिकेच्या पथकाने पाच दिवसांपूर्वी बांधकामाची पाहणी केली. लोंढे यांनी सुमारे २५ मी. x १० मी. मापाचा तळ मजला व पहिला मजला असे पक्के बांधकाम व त्यावर होर्डीग असे नंदीनी नदीच्या निळ्या पूररेषेच्या आत अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आले होते. या बांधकामाकरीता महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम अन्वये आवश्यक असणारी परवानगी नाशिक महापालिकेकडून घेतलेली नाही. बांधकाम विनापरवाना असल्यामुळे सार्वजनिक हितास व व्यक्तीगत हितास बाधा होण्याची शक्यता असून कायद्याचा अनादर करुन सार्वजनिक हितास व्यक्तीगत हितास बाधा आणल्याने आर्थिक हानीबरोबरच जीवितहानी होऊ शकते, असे नोटीसात म्हटले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम इज पाडले जाण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV