पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)। शहरात पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेसाठी खडी मशिन चौक ते येवलेवाडी या रस्त्याचा समावेश केला आहे. तेथे महापालिकेतर्फे रस्ते दुरुस्ती केली जाणार असताना आता त्याच रस्त्यावर ३१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. एकाच कामासाठी दोन वेळा निविदा काढली जात आहे.पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची सायकल स्पर्धा होणार आहे. पुणे शहरातून या स्पर्धेसाठीचा ७५ किलोमीटरचा मार्ग असणार आहे. या रस्त्यांची कामे करण्यासाठी महापालिकेने तब्बल १४५ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. सायकल स्पर्धेच्या मार्गात खडी मशिन चौक ते येवलेवाडी या रस्त्याचा देखील समावेश आहे.काही महिन्यापूर्वीच येवलेवाडी ते खडी मशिन चौक या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. यावेळी रस्त्याचे दुभाजक दुरुस्ती करणे आवश्यक होते. आता अवघ्या सहा महिन्यामध्ये या रस्त्यावर दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पथ विभागाने निविदा काढली आहे. यामध्ये रंगरंगोटी, दुभाजक दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती यासह अन्य कारणांसाठी ३१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच रस्त्यावर दोन निविदा काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु