पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : वैद्यकीय प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत नव्याने प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रे चुकीची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे जवळपास १५२ विद्यार्थ्यांची अपलोड केलेली कागदपत्रे चुकीची असल्याचे आढळून आले. या १५२ विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) नोटीस पाठविली आहे.सीईटी सेलमार्फत सध्या वैद्यकीय प्रवेशाची तिसरी फेरी सुरु आहे. या तिसऱ्या फेरीची अस्थायी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर काही नवीन इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज भरला. काही विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांबाबत सीईटी कक्षाकडे तक्रारी आल्या.या तक्रारींची दखल घेत तिसऱ्या फेरीत प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यात १५२ विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे प्रथमदर्शी चुकीची असल्याचे आढळून आले. या विद्यार्थ्यांना आता सीईटी कक्षाने नोटीस पाठवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु