सोलापूर, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर भाजपमध्ये पुन्हा गटबाजीचा भडका उडाला आहे. आमदार विजयकुमार देशमुख आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यातील जुना संघर्ष नव्या रूपात उफाळला असून,भाजप अंतर्गत वादावर ते काय भूमिका मांडतात, यावर पक्षाची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे. २०१७ पासूनचे देशमुख-तडवळकर यांच्यातील राजकीय वैमनस्य आता उघडपणे समोर आले आहे. गेल्या आठवड्याभरात प्रभाग क्र. ११ मधील आमदार देशमुख व आमदार कोठे यांच्यातील हद्दीचा वाद, सेवा पंधरवड्यात देशमुख यांचा फोटो वगळणे, समाजाच्या बैठकीत आमदार देशमुख यांनी लाथा मारण्याचे केलेले वक्तव्य, तसेच शहर उत्तरमध्ये पर्यायी यंत्रणा उभारण्याची मागणी या सर्व घटनांमुळे शहर भाजपमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.पुण्यात झालेल्या पक्षीय बैठकीत आमदार देशमुख यांची गैरहजेरी, आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले हा कलह भाजपचे महापालिकेतील संख्याबळ वाढविण्याऐवजी पाडापाडीचे राजकारण वाढवेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस आजच्या दौऱ्यात दोन्ही नेत्यांना चर्चेच्या टेबलावर बसवून वाद मिटवतात का?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड