सोलापूर, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील ३३ जिल्ह्यांमधील ६८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी बाधितांना भरपाई देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आतापर्यंत बुलडाणा, हिंगोली, सातारा, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचेच अंतिम पंचनामे अहवाल सरकारला मिळाले आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार नाही, अशी स्थिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून तलाठी, मंडलाधिकारी पंचनामा अहवाल तहसीलदारांकडे पाठवित आहेत. त्यानंतर तालुक्याच्या एकत्रित अहवालावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षरी घेऊन तो अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. त्यांच्याकडून पिकनिहाय पेरणी क्षेत्र, रब्बी हंगामाचे क्षेत्र यानुसार पडताळणी केली जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड