देशात महाराष्ट्राला ‘स्वच्छ भारत मिशन’ मध्ये अग्रक्रमावर आणावे - पाणीपुरवठा मंत्री
मुंबई, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये प्रभावी काम करून देशांमध्ये राज्याला अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात स्वच्छ भार
देशात महाराष्ट्राला ‘स्वच्छ भारत मिशन’ मध्ये अग्रक्रमावर आणावे -         पाणीपुरवठा मंत्री


मुंबई, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबवणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये प्रभावी काम करून देशांमध्ये राज्याला अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात स्वच्छ भारत मिशनच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नाईक आणि अतिरिक्त मिशन सचिव शेखर रौंदळ सहसचिव डॉ.बी.जी. पवार, मुख्या अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळवावा, यासाठी सर्वांचे समन्वय व एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे. या उद्दिष्टासाठी स्वयंसेवी संस्था, कर्मचारी तसेच महिला बचत गटांचा सहभाग वाढविणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करून स्वच्छतेबाबत जागरूकता आणि सहभाग वाढवावा, असे सांगून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, मिशन अंतर्गत असलेली सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. सार्वजनिक शौचालयांची कामे गतीने पूर्ण व्हावीत. स्वच्छतेसाठी लागणाऱ्या जागा स्थानिक पातळीवर समुपदेशनाद्वारे उपलब्ध करून घ्याव्यात. तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडवाव्यात.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्याचा निधी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आणि कोणत्याही कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही स्पष्ट सांगितले.

यावेळी स्वच्छता ही सेवा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गावे निर्माण करणे, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, मैलागाळ व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

राज्याच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करून महाराष्ट्राला स्वच्छ भारत मिशन मध्ये देशात अग्रक्रमावर आणावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande