रत्नागिरी, 15 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाकरिता घेण्यात आलेल्या ‘कोकणातील खाद्यसंस्कृती’ लेख स्पर्धेत सौ. स्वानंदी जोगळेकर यांना प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे.
कोकणातील वैविध्यपूर्ण विषयांचे दस्तावेजीकरण करण्याच्या मुख्य उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या साप्ताहिक कोकण मीडियाचा दहावा दिवाळी विशेषांक प्रसिद्ध होत आहे. या अंकासाठी कोकणातील खाद्यसंस्कृती हा विषय घेण्यात आला असून त्या विषयावर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील गुणानुक्रमे पहिले तीन विजेते असे - सौ. स्वानंदी स्वरूप जोगळेकर (चेतना श्रीकृष्ण धोंड्ये, साखरपा, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी), भक्ती बिसुरे, पुणे, सुषमा कद्रेकर, मुंबई. याशिवाय सौ. साधना उदय बोडस, रत्नागिरी, डॉ. मंगल महादेव पटवर्धन, रत्नागिरी आणि
डॉ. रश्मी जोशी, धारगळ-गोवा यांना उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर झाले आहेत. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
विजेत्यांच्या लेखांबरोबरच अन्य स्पर्धकांचे निवडक लेख दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. कोकणातील खाद्यसंस्कृती या विषयावरील अन्य वैविध्यपूर्ण लेखही अंकात वाचता येतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी