छत्रपती संभाजीनगर, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।
झालेली अतिवृष्टी, त्यामुळे दूषित झालेले जलसाठे, दिवाळी सारख्या सणामुळे खाद्यपदार्थांतून होणाऱ्या भेसळीचा वाढता धोका या पार्श्वभुमिवर आरोग्य यंत्रणांनी अधिक सतर्क राहून दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आरोग्य यंत्रणांना दिले.
जिल्हा आरोग्य यंत्रणांचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, महिला व बालविकास अधिकारी मंगला पांचाळ तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत वातावरणीय बदल व आरोग्य, नियमित लसीकरण, गोवर रुबेला लसीकरण, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अभियान, एचआयव्ही एड्स नियंत्रण अभियान, गर्भलिंग निदान विरोधी अभियान , आपात्कालिन वैद्यकीय सेवा याबाबत आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या गेल्या वर्षा इतकीच असली तरी अपघातानंतर मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आरोग्य सेवांची समिक्षा करण्यात यावी. जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन आरोग्य विषयक मार्गदर्शन करावे,असे निर्देश त्यांनी दिले.
अतिवृष्टिमुळे ग्रामिण भागात पाणीसाठे व स्रोत दूषित झाले आहेत. तसेच शहरी भागात सणाच्या पार्श्वभुमिवर अन्नपदार्थात भेसळ होण्याची शक्यता आहे. त्याविरुद्ध संबंधित विभागांनी बाजारात मिळणारे अन्न पदार्थ नमुने चाचणी करावी. ऐन सणासुदीत नागरिकांचे आरोग्य उत्तम राहिल यासाठी अरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी. खेडोपाडी पाण्याचे नमुने तपासावे. नैमित्तिक संसर्ग उद्रेकांबाबत खबरदारी घ्यावी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
L---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis