नांदेड, 15 ऑक्टोबर, (हिं.स.)। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मागे असलेल्या नांदेड ग्रामीण दंत महाविद्यालय व संशोधन केंद्राकडे जाणाऱ्या पांगरी गाव ते कॉलेजदरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडबडीत खड्डे निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक व विशेषतः वृद्ध रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सदर रस्ता पावसाळ्यात चिखलमय बनत असून, साचलेल्या पाण्यामुळे रुग्णालयाकडे येणाऱ्या रुग्णांचा संपर्क तुटतो आहे. परिणामी अनेकदा रुग्णवाहिका व इतर वाहने अडकण्याच्या घटना घडत आहेत. तसेच या रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या देखील वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित नागरिक व विद्यार्थी वर्गाने आमदार श्री. आनंदराव पाटील बोंढारकर (नांदेड दक्षिण) यांना निवेदन देऊन पांगरी गाव ते नांदेड रूरल डेंटल कॉलेज या मार्गाचे डांबरीकरण करून तातडीने दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “रस्ता नीट झाल्यास केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही मोठा दिलासा मिळेल.”
नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की आमदार बोंढारकर या विषयाकडे तातडीने लक्ष देतील आणि रस्त्याच्या दुरुस्तीला मंजुरी देऊन काम लवकर सुरू करतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis