मुंबई, 15 ऑक्टोबर,(हिं.स.)। बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आणि अप्रतिम नृत्यांगना मधुमती यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले आहे. ६०, ७० आणि ८० च्या दशकात त्यांच्या अद्वितीय नृत्यकौशल्यामुळे त्या चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होत्या. त्या काळात त्यांची तुलना सुप्रसिद्ध नृत्यांगना हेलेन यांच्याशी केली जायची.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली वाहताना लिहिले, “त्या माझ्या पहिल्या आणि कायमच्या गुरु आहेत.” त्यांच्या या शब्दांतून मधुमतींविषयीचा आदर आणि आपुलकी स्पष्ट दिसून आली.
मधुमती यांनी ‘आंखें’, ‘टॉवर हाऊस’, ‘शिकारी’, ‘मुझे जीने दो’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांनी १९५७ साली एका अप्रकाशित मराठी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांविषयी त्यांना असलेली ओढ विशेष उल्लेखनीय होती. त्या भरतनाट्यम, कथ्थक, मणिपुरी आणि कथकली या नृत्यप्रकारांमध्ये प्रशिक्षित होत्या.
मधुमती यांनी ज्येष्ठ नर्तक दीपक मनोहर यांच्याशी विवाह केला होता. ते त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते आणि चार मुलांचे वडील होते.
त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक कुशल नृत्यांगना, एक समर्पित कलाकार आणि एक सुवर्णयुगातील तेजस्वी व्यक्तिमत्व गमावले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर