परभणी, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : परभणी जिल्ह्यातील गाव व पाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत, नियमित व गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी आवश्यक ती सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.
मुंबई येथील निर्मल भवन येथे परभणी जिल्ह्यातील पाणीपुरवठा विषयक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र जलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन उपस्थित होते. दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे बैठकीत परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा माथुर तसेच संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.या बैठकीमध्ये जलजीवन मिशन, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांचा योजना-निहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या योजना अपूर्ण आहेत त्या तत्काळ पूर्ण कराव्यात, तसेच ज्यांच्या सुधारित अंदाजपत्रकांची गरज आहे ती त्वरित मंजुरीसाठी सादर करावीत, अशा स्पष्ट सूचना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.
तसेच वस्सा, आडगाव, आसेगाव, दुधगाव या गावांसह १०० योजनांना फेरमान्यता देण्याबाबत निर्देश दिले. वाडी व तांडे यांचे अंदाजपत्रकेही लवकर पाठवावीत, असे सांगत परभणी जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल याची खात्री करण्याचे सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.अधिकाऱ्यांनी परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे तसेच पुढील नियोजन याबाबत सविस्तर माहिती सादर केली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सर्व संबंधित विभागांना एकत्रित समन्वय ठेवून नागरिकांच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे त्वरित निवारण करावे अशा सूचना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis