अमरावती, 15 ऑक्टोबर (हिं.स.) : अमरावती शहरात चायनीज मांजामुळे आणखी एक गंभीर अपघात घडला आहे. २६ वर्षीय सैयद सैफी हसन या तरुणाचा गळा धारदार नायलॉन मांज्याने कापल्याची घटना समोर आली असून, सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सैयद सैफी हसन हे आपल्या दुचाकीवरून जात असताना अचानक रस्त्यावर लटकलेल्या चायनीज मांज्याच्या संपर्कात आले. मांजा थेट त्यांच्या गळ्यावर आला आणि तीव्र जखम झाली. अपघात इतका गंभीर होता की त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या सैयद सैफी हसन डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, नायलॉन मांजा विकणाऱ्या दुकानदारांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. अशा जीवघेण्या मांज्याच्या विक्रीवर बंदी असूनही खुलेआम विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. प्रशासनाने आणि पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चायनीज मांज्यामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याने या समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी