पुणे, 15 ऑक्टोबर (हिं.स.)।
समाज कल्याण विभाग स्थापना दिन व व्यसनमुक्ती सप्ताहाच्या निमित्ताने समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा आणि नशाबंदी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही चालतो व्यसनमुक्तीसाठी” या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.छत्रपती संभाजी मैदान ते शनिवारवाडा यादरम्यान हजारो युवक-युवतींच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली.
या रॅलीचा शुभारंभ सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे तसेच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य संघटक व सचिव अमोल स. भा. मडामे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी नशाबंदी मंडळाचे विचार मासिक “कल्याणयात्रा – व्यसनमुक्तीच्या गाथा” याचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कल्याणयात्रा चे संपादक अमोल मडामे, होप व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ. विजय मोरे, नशाबंदी मंडळाचे विभागीय संघटक प्रमुख ऍड. सुरेश सकटे, पुणे जिल्हा संघटक डॉ. फडके, पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
रॅलीच्या सुरुवातीला कर्वे समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य सादर केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पथनाट्य सादरीकरणाचे कौतुक सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी केले. रॅलीच्या नियोजनात मोलाचा वाटा उचलल्याबद्दल मॉडर्न कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती संसारे यांचा सत्कार सहाय्यक आयुक्त लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला.
रॅली छत्रपती संभाजी मैदान येथून सुरू होऊन पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून शनिवारवाड्यापर्यंत मार्गक्रमण करत पार पडली. रॅलीच्या अखेरीस शनिवारवाड्याच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ सहाय्यक आयुक्त लोंढे यांच्याकडून देण्यात आली.
यावेळी नशाबंदी मंडळाचे राज्य संघटक व रॅलीचे संयोजक अमोल मडामे यांनी सांगितले की, “निर्व्यसनी तरुण पिढी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांना व्यसनमुक्त जीवनाकडे प्रवृत्त करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले. सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “व्यसनमुक्त जीवनातूनच व्यक्तीचा उत्कर्ष साध्य होऊ शकतो आणि त्यातूनच समाजसेवा शक्य आहे.”
---------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु