अकोला : सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान
अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचा “आदिशक्ती अभियान” आता राबविले जात असून ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर लाखो रूपयांच्या बक्षिसांची संधी उपलब्ध होणार आहे.
अकोला : सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान


अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाचा “आदिशक्ती अभियान” आता राबविले जात असून ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर लाखो रूपयांच्या बक्षिसांची संधी उपलब्ध होणार आहे. या अभियानासाठी जिल्ह्यात ग्रामस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत व सात तालुकास्तरीय समित्या व एक जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हा स्तरीय समितीची पहिली बैठक मा. जिल्हाधिकारी अकोला यांच्या सुचनेवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या अभियानाचे उद्दिष्ट म्हणजे समाजातील सर्व घटकातील महिलांना विविध योजनांचा लाभ पोहोचवणे, महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या ओळखणे, जनजागृती करणे आणि चळवळ निर्माण करणे.जिल्ह्यात जनजागृती सुरू असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती राजश्री कौलखेडे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री गिरीश पुसदकर यांनी दिली. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत केलेल्या कामगिरीचे शासन निर्णयानुसार मूल्यमापन केले जाईल आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येतील. तालुका स्तरावर प्रथम बक्षीस ₹ 1 लाख, द्वितीय ₹ 50 हजार व तृतीय ₹ 25 हजार; जिल्हा स्तरावर प्रथम ₹ 5 लाख, द्वितीय ₹ 3लाख व तृतीय ₹ 1 लाख ; तर राज्यस्तरावर प्रथम ₹ 10 लाख, द्वितीय ₹ 7लाख व तृतीय ₹ 5लाख इतकी रक्कम जाहीर करण्यात आली आहे. या माध्यमातून ग्राम चळवळीद्वारे महिलांच्या समस्यांविषयी संवेदनशीलता वाढवून, कुपोषण, बालमृत्यु, मातामृत्यू यांचे प्रमाण कमी करणे, लिंगभेदात्मक विचारांना आव्हान देणे, किशोरवयीन मुलींचे शिक्षण वाढवणे, बालविवाह प्रतिबंध करणे, लैंगिक आणि शारीरिक अत्याचार प्रतिबंध करणे, अनिष्ट रूढींचे निर्मूलन करणे तसेच महिला नेतृत्व वाढवणे या उद्दिष्टांना प्राधान्य दिले जाणार आहे.महिला व बालविकास विभाग, अकोलाच्या वतीने सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande