अकोला, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी नुकतीच अकोला तालुक्याची चर्चा सभा आयोजित केली होती. युवानेते सुजात आंबेडकर यांनी या सभेत अकोला तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मी माझ्या सर्कलचा बाळासाहेब आंबेडकर या भुमिकेतुन निवडणुकीच्या कामाला लागा.! असे आव्हान केले. पुढे बोलतांना युवानेते सुजातदादा आंबेडकर म्हणाले की, जिल्हा परिषदेतील दलितवस्तीचा निधी हा वंचित बहुजन आघाडीने मंजुर घेतला व दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी वाटत केला परंतु इथल्या भाजपाच्या पालकमंत्र्यांनी तो निधी थांबवून जिल्ह्यातील दलितवस्त्यांचा विकास थांबवला. जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहत असलेले लोक हे बहुजन, दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील आहेत. पाणी, वीज, आरोग्य आणि शेती यांसारखे मूलभूत प्रश्न आजही प्रलंबित आहेत. जोपर्यंत आमदार खासदार काम करत नाहीत, तोपर्यंत जिल्हा परिषद सदस्यांना काम करताना अडचणी येत राहणार. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ जे आमदार आणि खासदार निवडून दिले गेले, त्यांनी अकोल्याकडे का लक्ष दिलं नाही? वंचित बहुजनांवर सतत टीका केली जाते, पण येथील प्रस्थापितांना प्रश्न विचारण्याची हिंमत का दाखवली जात नाही? असा प्रश्नही ह्यावेळी युवानेते सुजातदादा आंबेडकर उपस्थित केला. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आता प्रत्येकाने ‘मीच माझ्या सर्कलचा बाळासाहेब आंबेडकर’ या भूमिकेतून काम करावं असे आव्हान त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना केले. ह्यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मा. आम. खतीब साहेब, प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. आम्रपालीताई खंडारे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, माजी जि. प. गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, माजी जि प. अध्यक्ष सौ. पुष्पाताई इंगळे, माजी सभापती आकाश शिरसाट, मा. जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव, तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, तालुका कार्याध्यक्ष पवन बुटे, महिला तालुकाध्यक्ष मंगलाताई शिरसाट, सौ. वैशाली विकास सदांशिव, माजी जि. प. सदस्य निताताई गवई, अशोक शिरसाट, दिपक गवई, युवा महानगर अध्यक्ष वैभव खडसे, जय रामा तायडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक सावंग यांनी केले तर प्रास्ताविक किशोर जामणिक यांनी तर आभार तालुका महासचिव शरद इंगोले यांनी मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे