कोल्हापूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्हापूर शहराच्या स्वागत कमानीची अत्यंत दुरवस्था झाली असून,सदर स्वागत कमान अत्यंत धोकादायक बनली आहे. येत्या दोन ते चार दिवसांमध्ये सदरची कमान उतरवून घेण्यात यावी. तसेच शहरात प्रवेशासाठी तावडे हॉटेल चौकात नवीन कमान उभी करण्यात येईल. या कामासाठी पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क केला असून, रु.तीन कोटीचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे. आ राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह या कमानीची पहाणी केली त्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहीती दिली.
या स्वागत कमानीची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. तसेच सदर स्वागत कमान अत्यंत धोकादायक बनली आहे. येथून हजारो वाहने येजा करतात, त्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास प्रचंड मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. असे निदर्शनास आले.
यावेळी मनपा अधिकाऱ्यांना सूचना देताना आमदार क्षीरसागर यांनी, सदरच्या कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता सदर कमान पूर्णपणे उतरवून घेणे आवश्यक असून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये सदरची कमान उतरवून घेण्यात यावी. तसेच शहरात प्रवेशासाठी तावडे हॉटेल चौकात नवीन कमान उभी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा. कमानीच्या सुंदर आणि आकर्षक अशा डिझाईन साठी डिझाईन स्पर्धा घ्याव्यात. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारी, पुढील काळात वाढणाऱ्या वाहतुकीचा अभ्यास करून भव्य प्रवेशद्वाराचे डिझाईन करण्यात यावे. सदर प्रवेशद्वार तावडे हॉटेल जवळ उभारण्यात येणार असल्याने जागा देखील मोठी मिळेल. या कामासाठी पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क केला असून, रु.तीन कोटीचा निधी तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी हा विषय ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवला, त्यांचे देखील अभिनंदन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
या पहाणी दरम्यान माजी नगरसेवक सुहास लटोरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई, स्ट्रक्चरल ऑडिटर हडकर, अविनाश कामते यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar