डिबेंचर कपातीच्या विरोधात गोकूळवर जनावरांसह मोर्चाने धडक
कोल्हापूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ''(गोकुळ)मधील प्राथमिक दूध संस्थांना जाहीर केलेल्या फरक बिलातून डिबेंचरच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या रकमेत 40 टक्के कपातीचा आरोप करत प्राथमिक दूध संस्थांच्या उत्पादकांनी कोल्हापूर शहर
प्राथमिक दूध संस्थांच्या उत्पादकांनी काढलेला गोकुळवर मोर्चा


कोल्हापूर, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ'(गोकुळ)मधील प्राथमिक दूध संस्थांना जाहीर केलेल्या फरक बिलातून डिबेंचरच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या रकमेत 40 टक्के कपातीचा आरोप करत प्राथमिक दूध संस्थांच्या उत्पादकांनी कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये प्राथमिक दूध संस्थांच्या उत्पादकांनी जनावरे कार्यालयात घुसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. या मोर्चाचे नेतृत्व भाजप महिला आघाडी राज्य उपाध्यक्ष गोकुळमधील विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केले.

शौमिका महाडिक यांनी डिबेंचर मुद्यावरून गोकुळ अध्यक्षांनी माहिती दिली पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी गोकुळ प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चेकऱ्यांनी जनावरे गोकुळ कार्यालयात घुसवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार झटापट झाली. जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. आंदोलकांनी 'जय श्रीराम' आणि कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी बोलताना शौमिका महाडिक म्हणाल्या की, अध्यक्षांनीच उत्तरं देणं संयुक्तिक आहे. कारण अध्यक्षांची काय भूमिका आहे ते काय निर्णय घेणार आहेत, त्यांना त्याचं गांभीर्य आहे का? गेल्या चार वर्षांमध्ये शासनाचा जो लेखा परिक्षण अहवाल आहे तो त्यांच्या विरोधात जातो.

गेल्या 12 दिवसात एकही मीटिंग झालेली नाही. गोकुळचे व्यवस्थापकीय संचालक फक्त तांत्रिक गोष्टी सांगत आहेत. त्यांनी सांगितले की, त्यापेक्षा मला असं वाटतं की चार प्रतिनिधींना बोलवून सुवर्णमध्य प्रशासनाने आणि संस्था प्रतिनिधींनी काढणं गरजेचं होतं. शेतकऱ्यांची डिबेंचरची रक्कम 40 टक्के केली म्हणजे गोकुळच्या इतिहासात सगळ्यात मोठी रक्कम कट केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, दिवाळी तोंडावर आहे. त्यांना थोडेसे.जास्त पैसे आपण देऊ शकतो. गोकुळकडून प्राथमिक दूध संस्थांना डिबेंचर स्वरूपात याही वर्षी रक्कम देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असला, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्के रक्कम कपात केली असल्याचा आरोप दूध संस्थांनी केला. आणि मोर्चाद्वारे गोकूळच्या ताराबाई पार्क कार्यालयावर धडक दिली. जिल्हयातील गोकूळला दूध पुरवठा करणाऱ्या संस्थाचे प्रतिनिधी दूध उत्पादक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.

याच मुद्यावरून आजच्या मोर्चापूर्वी शौमिका महाडिक यांच्यासह संस्था प्रतिनिधींनी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांना घेराव घालत विचारणा केली होती. संस्था प्रतिनिधींकडून गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते.

गोकुळचा कारभार, टँकर, संचालकांची मौज, वासाचं दूध आदी मुद्यावरून गोकुळचा कारभार कायम चर्चेत राहिला असला, तरी डिबेंचर मुद्दा पहिल्यांदाच चर्चेत आला आहे. गोकुळकडून गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ही कपात केली जात आहे. प्राथमिक दूध संस्थांना बळकटी देण्यासाठी 'गोकुळ'ने नफ्यातील शिल्लक रक्कम डिबेंचर म्हणून संस्थांच्या नावे टाकण्याचा निर्णय तत्कालीन अध्यक्षांसह संचालकांनी घेतला होता. ही रक्कम नफ्यावर निश्चित केली जाते. चालू वर्षात मिळालेला नफा विचारात घेत 72 कोटी रुपये संस्थांच्या नावे वर्ग करण्यात आली. यामध्ये गायी म्हशीच्या दूधाचा फरक, डिबेंचर व्याज, दूध फरकावरील व्याज व लाभांश आदी रक्कम संस्थाच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. मात्र, डिबेंचरमध्ये कपात अधिक केल्याचा मुद्दा प्राथमिक दूध संस्थांकडून करण्यात आला आहे.

फरक बीलाचे १३६ कोटी रु. वाटणार असे जाहीर केले पण प्रत्यक्ष त्यातून डिबेंचर स्वरूपात कपात केलेली 40 टक्के रक्कम कपात केली. ती प्राथमिक दूध संस्थांना परत करावी, यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी दूध उत्पादक संस्था प्रतिनिधींनी कोल्हापुरातील कार्यालयासमोर गोकुळ समोर उपोषण केले होते. या मोर्चात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जोतीराम घोडके, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे, चंद्रशेखर मस्के, बाबासाहेब गोसावी, पांडुरंग मगदूम, अनिल कुरणे, अनिल जाधव यांच्यासह संस्था प्रतिनिधी सहभागी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande