नाशिक, 17 ऑक्टोबर (हिं.स.)
: अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा दिलासा मिळावा, यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) नाशिक महानगर शाखेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरूंविरुद्ध 'भीक मागो' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकऱ्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळा आणि महाविद्यालयांसाठी परीक्षा शुल्क माफीची घोषणा केली असली, तरी पुणे विद्यापीठाने अद्याप त्याबाबत कोणतेही परिपत्रक काढलेले नाही. उलट विद्यापीठाने २० टक्के शुल्कवाढ करून विद्यार्थ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. या आंदोलनादरम्यान अभाविप कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत कुलगुरूंसाठी प्रतीकात्मक भीक मागून विद्यापीठ प्रशासनाचा निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य व सहाय्यक कुलसचिव यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या विषयावर उद्या विद्यापीठ बैठकीत निर्णय घेऊन परिपत्रक जारी करण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री मेघा शिरगावे म्हणाल्या, विद्यापीठ कुलगुरूंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास टाळाटाळ केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे ही जबाबदारी टाळण्यासारखी गोष्ट आहे. ज्यांच्या घरात पाणी घुसले, शेत जमिनी वाहून गेल्या, अशा विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करणे अमानुष आहे. ज्यांनी शुल्क भरले आहे त्यांना परतावा आणि ज्यांनी भरलेले नाही त्यांना माफी मिळालीच पाहिजे. नाशिक महानगर मंत्री व्यंकटेश औसरकर म्हणाले, जर उद्या विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर अभाविप आणखी तीव्र आंदोलन छेडेल. सामान्य विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी अभाविप शेवटपर्यंत लढेल. पुणे विद्यापीठानेही विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी तत्काळ परीक्षा शुल्क परतावा व माफी लागू करावी, अशी मागणी 'अभाविप'ने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV