हिंगोली, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळी सणानिमित्त अन्नपदार्थ खरेदी करताना काळजी घ्यावी असे अन्न व औषध प्रशासन विभागाने आवाहन केले आहे. दिवाळी सणासाठी जनतेकडून मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थाची खरेदी करण्यात येते. अशा वेळी अन्न पदार्थामध्ये भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढते. अशा प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी व जनतेस निर्भेळ अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अनंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विशेष मोहिम राबवित आहेत.
या मोहिमेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांमधून व सर्व स्तरांवरून किरकोळ विक्रेता, वितरक, उत्पादक, मिठाई विक्रेता, दुध विक्रेते, किराणा अन्न पदार्थ इत्यादीकडून अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या मोहिमेमध्ये 56 अन्न नमुने ज्यामध्ये तेल, मिठाई, दूध, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी अन्नपदार्थाचा समावेश आहे. सन 2025-26 या वर्षात आजपर्यंत 7 प्रकरणामध्ये 4 लाख 29 हजार 40 रुपये किमतीचे अन्नपदार्थ भेसळीच्या अनुषंगाने जप्त करण्यात आले आहे. हे अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. काही अन्न नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये दुध व तत्सम पदार्थांचे 7 अहवाल प्रमाणित आले व 2 अहवाल कमी दर्जाचे प्राप्त झाले. कमी दर्जाच्या अहवालांवर कायद्यांतर्गत कार्यवाही सुरु आहे. उरलेल्या अन्न पदार्थांचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि अन्न पदार्थामध्ये भेसळ आढळून आल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियम व नियमनांच्या अनुषंगाने संबंधित अन्न पदार्थ विक्रेत्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
दिवाळीनिमित्त अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी. मिठाईची खरेदी करताना शक्यतो ती ताजी असल्याची खात्री करुन आवश्यकतेनुसार खरेदी करावी. खरेदी केलेल्या अन्न पदार्थाचे पक्के बील घ्यावे. परवानाधारक, नोंदणीधारक पेढीकडूनच अन्न पदार्थाची खरेदी करावी. अनोळखी व्यक्तीकडून अन्न पदार्थाची खरेदी करु नये. भडक खाद्यरंग असलेली मिठाई खरेदी करु नये. खवा, मावा यापासून तयार केलेली मिठाई शक्यतो चार तासात खावी. मिठाईवर बुरशी आढळून आल्यास ती खाऊ नये.
मिठाई खराब झाल्याची शंका आल्यास ती नष्ट करावी. उघड्यावरचे अन्न पदार्थ खरेदी करण्याचे टाळावे. पॅकबंद अन्न पदार्थ खरेदी करताना बॅच नंबर, बेस्ट बिफोर दिनांक, एक्सपायरी दिनांक तपासून खरेदी करावे. खाद्यतेलाचे टिन खरेदी करताना ते गंजलेले असल्यास खरेदी करु नये. खाद्यतेलाचे पक्के खरेदी बील घ्यावे. यानंतरही अन्न पदार्थ, मिठाई खरेदी करताना शंका आल्यास अन्न व औषध प्रशासन, हिंगोली कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis