बीडमध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा पार पडला बीड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण त्यांना वेगळं आरक्षण द्या. आमच्या हक्काचं आरक्षण देणार असाल तर त्याला आम्ही विरोध करणार असं वक्तव्य माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. यापुढे ओबीसी आरक्षणाला लढा हा देशाचे नेते छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली लढण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींची ताकद दाखवून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. बीडमध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा पार पडला. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली. आजही मराठ्यांनी त्यांचे वेगळं आरक्षण घ्यावं, ईडब्लूएसमधून घ्यावं. आमचा त्यांना विरोध नाही. पण आमच्या ताटातील काही घेत असाल तर आम्ही त्याला विरोध करणार. आपली ताकद ही भुजबळ साहेब आहेत. ते देशाचे नेते आहेत, आपल्या ओबीसी समाजाचं आरक्षण त्यांच्या नेतृत्वाखाली आपण टिकवून ठेऊ. आपलं ओबीसी आरक्षण आपल्याला टिकवायचं आहे. यापुढे कुणाला घाबरायचं नाही. कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यायचं. आपसातले वाद बाजूला ठेवा. आता येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामध्ये एकमेकांच्या विरोधात राहू नका, एकीने राहा. त्यामध्ये आपली ताकद दाखवून द्या. असे ते म्हणाले. ---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis