जळगाव, 17 ऑक्टोबर (हिं.स.) भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात चारचाकीने कट मारल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट समोरील वाहनावर आदळली. या दुर्घटनेत दोन तरुण जागीच ठार झाले. ही घटना चोपडा-लासुर रस्त्यावरील मामलदे फाट्याजवळ घडली. अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय-२५) आणि पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय-२३) असं मयतांची नावे आहेत.चोपडा तालुक्यातील मामलदे येथील अमोल पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे दोघे तरुण चोपडा शहरातील कामे आटोपून आपल्या दुचाकीने मामलदे गावाकडे परतत असताना चोपडा-मामलदे फाटाच्या दरम्यान समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार कट मारला. अचानक कट मारल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट समोरील वाहनावर आदळली.हा अपघात इतका गंभीर होता की, अमोल पाटील आणि पृथ्वीराज पाटील या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.दोन तरुण वयाच्या मुलांचे असे अकाली निधन झाल्याने मामलदे गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहनधारकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून अज्ञात वाहनधारकाचा शोध सुरू केला आहे. या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर