चंद्रपूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राने अभिमानास्पद कामगिरी केली असून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (National Quality Assurance Standards -NQAS) प्रमाणपत्र मिळविणारे हे जिल्ह्यातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रुग्णसेवेची गुणवत्ता, स्वच्छता, दस्तऐवजीकरण, सुविधा, मानव संसाधन व्यवस्थापन आणि रुग्ण समाधान या विविध घटकांवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे मूल्यांकन करण्यात आले. सर्व मापदंडांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राने मानांकन संपादन केले.
या केंद्रात मातृ व बाल आरोग्य, अ-संसर्गजन्य रोग तपासणी, लसीकरण, प्रयोगशाळा सुविधा, आपत्कालीन सेवा आणि डिजिटल नोंद प्रणाली या सर्व सेवा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध आहेत. केंद्राच्या परिसरात स्वच्छता, हिरवळ आणि रुग्णाभिमुख सुविधा यामुळे हे केंद्र आदर्श आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जात आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी सांगितले की, दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्रमाणपत्र मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे. या यशामागे केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचा संयुक्त सहभाग आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याकरीता आवश्यक निधीची तरतूद करून दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सर्व प्राथमिक आरोग्य संस्थेचा आढावा घेऊन मार्गदशन केले व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील त्रुटीची पूर्तता करण्याकरिता आवश्यक सहकार्य केले. राज्य व जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून दुर्गापूर आरोग्य केंद्राच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून हे केंद्र आता इतर सर्व आरोग्य केंद्रांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव