नांदेड, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी “एक हात माणुसकीचा” या भावनेतून संस्कृति संवर्धन मंडळ, सगरोळी आणि नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून कॅनपॅक इंडिया लि., छत्रपती संभाजीनगर यांच्या आर्थिक सहकार्यातून हसनाळ (ता. मुखेड) येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे, शेतीजमिनीचे, जनावरांचे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने अन्नधान्य व संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर मुखेड तालुक्यातील हसनाळ, रावणगाव, भींगोली आणि भाटापूर या गावांतील एकूण १२५० पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांना किराणा किटचे वाटप सुरू करण्यात आले. या किटमध्ये दिवाळीच्या फराळासाठी लागणारे साहित्यही समाविष्ट असून, शेतकरी कुटुंबांना सणाचा आनंद घेता यावा हा या उपक्रमाचा हेतू आहे.
अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असले तरी, शेतकऱ्यांनी हिम्मत सोडू नये असा संदेश देत कॅनपॅक इंडिया लि., नाम फाउंडेशन, केअरिंग फ्रेंड्स आणि संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी यांनी “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा विश्वास दिला.
यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी पूरस्थितीतील अडचणींचा आढावा घेतला, तसेच पाहणीस आलेल्या प्रतिनिधींनी गावाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या गरजा जाणून घेतल्या.
या प्रसंगी संस्कृति संवर्धन मंडळाचे चेअरमन श्री. प्रमोद देशमुख, कॅनपॅक इंडिया प्रा. लि. चे श्री. मनोज पल्लोड व टीम, केअरिंग फ्रेंड्स मुंबईचे श्री. निमेशभाई, तसेच नाम फाउंडेशनचे श्री. गणेश गायकवाड उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis