लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)
आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती (एचएमआयएस) अंतर्गत कुटुंब कल्याण, माता-बाल संगोपन व लसीकरण कार्यक्रमात लातूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असून, ऑगस्ट २०२५ अखेरच्या राज्यस्तरीय जिल्हानिहाय अहवालानुसार लातूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पुणे येथील राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक यांनी तयार केलेल्या या अहवालात एकूण गरोदर माता नोंदणी, १२ आठवड्यापूर्वी नोंदणी, गरोदर मतांचे लसीकरण, आयएफए १८० गोळ्या वितरण, प्रसुतीपूर्व चार तपासण्या, अति जोखमीच्या व रक्तक्षयग्रस्त मातांचे उपचार, एकूण प्रसूती, बालक नोंदणी, कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण, झिरो डोसपासून गोवर-रुबेला पर्यंतचे प्राथमिक लसीकरण व संपूर्ण सुरक्षित बालक यासारख्या आरोग्य निर्देशकांचा विचार करून ही रँकिंग ठरविण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. नितीन बोडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल भागवत व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. तसेच, जिल्हा सनियंत्रण मूल्यमापन अधिकारी मंगेश रणदिवे व त्यांच्या टीमने अहवाल सादरीकरण केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis