छत्रपती संभाजीनगर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। छ. संभाजीनगर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना दिवाळी सणाच्या पार्श्वभुमिवर जिल्हा प्रशासनाने ‘एक हात मदतीचा’ दिला. दिवाळ सणासाठी लागणाऱ्या वाण सामानाचे किट देण्यात आले. शेतकरी आत्महत्येसारख्या दुर्दैवी प्रसंगाला आपण सामोरे जात असतांना खचून जाऊ नका, प्रशासन, समाज तुमच्या सोबत आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थित शेतकरी कुटुंबियांना दिलासा दिला.
जिल्हाधिकारी कार्यातील नियोजन सभागृहामध्ये ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत पैठण फुलंब्री आणि छत्रपती संभाजी नगर या तीन तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली. फराळ किट आणि किराणा साहित्य, रब्बी हंगामासाठी बियाणे किट वाटप करण्यात आले.
जिल्हा प्रशासनासोबत मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग संस्थान, वेरूळ यांच्या सहकार्याने साहित्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मनसुख झांबड, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, पैठण तहसीलदार ज्योती पवार, फुलंब्री तहसीलदार योगिता खटावकर, तसेच पैठण, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी कुटुंबीय या कार्यक्रमास उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, संकटात खचून न जाता त्यांच्या दुःखात जिल्हा प्रशासन आणि इतर नागरिक, संस्था मदतीला आहेत हा विश्वास या कार्यक्रमातून द्यायचा आहे,असे त्यांनी सांगितले.
या मदतीत आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासन निर्णयानुसार देय मदत, तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या सारख्या सामाजिक लाभाच्या योजनांचा लाभ तसेच सामाजिक संस्थांच्या व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले योगदान देऊन ही मदत वाटप करण्यात आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले.
-------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis