अमरावती, 17 ऑक्टोबर (हिं.स.)
अमरावती तालुक्यातील शेतकऱ्यांवर या हंगामात अभूतपूर्व संकट कोसळले आहे. बाफना कंपनीने बाजारात आणलेल्या सोयाबीन बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, शेंगांमध्ये दाण्यांचा पत्ताच नसल्याने शेतकऱ्यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले आहे.
शेतकऱ्यांनी बाफना कंपनीचे 25 किलो वजनाचे बियाण्याचे पोते 3200 रुपयांना नगदी खरेदी करून पेरले, मात्र पेरणीच्या वेळीच या बियाण्यांची उगवण शक्ती अत्यंत कमी आढळली. या संदर्भातील शेकडो तक्रारी कृषी विभागाकडे नोंदवण्यात आल्या. तरीही विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही.साडेतीन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी मशागत, फवारणी, खत-टॉनिक, फंगीसायड आणि कीटकनाशकांवर हजारो रुपये खर्च केले, परंतु परिणाम शून्य! शेंगा लागल्या तरी त्यात दाणे नाहीत. आज चार महिने उलटूनही या सोयाबीनचे पाने आणि दांड्या हिरवेच असून दाण्यांचा विकास झालेला नाही.
या संदर्भात शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कंपनीचे अधिकारी फोन उचलत नाहीत आणि शेतावर यायलाही तयार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार यांनी बाफना कंपनीवर तीव्र शब्दांत हल्ला चढवत म्हटले की,बाफना कंपनीने निकृष्ट, रोगीट बियाणे बाजारात आणून विदर्भातील शेतकऱ्यांना उध्वस्त केले आहे. कृषी विभाग आणि बियाणे महामंडळ यांची या सर्व प्रकरणात मिलीभगत असल्याचा त्यांनी आरोप केला.हटवार यांनी मागणी केली की, ज्या शेतकऱ्यांकडे कृषी केंद्राकडून खरेदी केलेल्या बाफना कंपनीच्या बियाण्यांची बिले आणि फवारणीच्या खर्चाचे पुरावे आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी.जर बाफना कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही, तर कंपनीविरोधात पोलीस तक्रार दाखल करून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा नितीन हटवार यांनी दिला आहे.दरम्यान, कृषी विभाग आणि बियाणे महामंडळाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.“शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा लुटणाऱ्या कंपन्यांना सरकारने रोखले पाहिजे, नाहीतर हे आंदोलन विदर्भभर पेटेल,”असा गर्भित इशारा हटवार यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी