रायगड, 17 ऑक्टोबर (हिं.स.) :
ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत कोंढे तर्फे श्रीवर्धन येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत गाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवटी, स्वदेस फाउंडेशन आणि लक्ष्मी चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे शिबिर पार पडले.
या शिबिरात तब्बल २१ प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. विशेषतः ग्रामीण महिलांमध्ये आढळणाऱ्या अॅनिमिया (रक्तक्षय) आजाराच्या तपासणीवर भर देण्यात आला. तपासण्यांमध्ये रक्तदाब, साखर, नेत्रतपासणी, ईसीजी, सीबीसी, कोलेस्ट्रॉल, सिकल सेल, थायरॉईड, एक्स-रे आदींचा समावेश होता.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायणकर आणि डॉ. विशाखा यांनी उपस्थितांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. सरपंच आदित्य कासरुंग, उपसरपंच सुभाष उजळ, सदस्य निखिल कदम, माजी सरपंच अनंत शिगवण आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वितेमध्ये आरोग्य विभाग, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले.
सरपंच आदित्य कासरुंग यांनी सांगितले, “आरोग्य ही खरी संपत्ती आहे. अशा उपक्रमांमुळे गावकऱ्यांना वेळेवर निदान व उपचार मिळणे शक्य होते.”. -----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके