एसी, फ्रिजही चालवणार, किंमत ३० हजारांपासून
मुंबई, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। ओला इलेक्ट्रिकने आपले पहिले नॉन-व्हेइकल उत्पादन ‘ओला शक्ती’ लाँच केले आहे. ही एक अत्याधुनिक घरगुती बॅटरी प्रणाली असून ती सौरऊर्जा किंवा ग्रिडमधून वीज साठवू शकते. या बॅटरी सिस्टीमची सुरुवातीची किंमत २९,९९९ रुपये ठेवण्यात आली असून, ती फक्त ९९९ रुपयांत ऑनलाइन किंवा स्टोअरमध्ये बुक करता येते. ‘ओला शक्ती’ची डिलिव्हरी मकरसंक्रांती २०२६ पासून सुरू होईल.
‘ओला शक्ती’ ही पूर्णपणे भारतात डिझाइन, इंजिनिअर आणि उत्पादित केलेली निवासी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (बीईएसएस) आहे. यात भारतातच विकसित केलेले अत्याधुनिक ४६८० सेल्स वापरले गेले आहेत. ही प्रणाली एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, इंडक्शन कुकटॉप, फार्म पंप तसेच कम्युनिकेशन डिव्हाइसेसना सहज वीजपुरवठा करू शकते. ईव्ही बॅटरीसारखीच ही तंत्रज्ञानाने सक्षम असली तरी ती खास घरगुती वापरासाठी डिझाइन केली गेली आहे.
‘ओला शक्ती’ विविध क्षमतांमध्ये उपलब्ध असून त्याच्या चार व्हेरियंट्स बाजारात आणले आहेत. १.५ किलोवॅट प्रतितास क्षमतेच्या मॉडेलची किंमत २९,९९९ रुपये, ३ किलोवॅट प्रतितास मॉडेलची किंमत ५५,९९९ रुपये, ५.२ किलोवॅट प्रतितास मॉडेलची किंमत १,१९,९९९ रुपये आणि सर्वाधिक ९.१ किलोवॅट प्रतितास क्षमतेच्या मॉडेलची किंमत १,५९,९९९ रुपये ठेवली आहे. पहिल्या १०,००० युनिट्ससाठी ही विशेष प्रारंभिक किंमत असणार असून त्यानंतर दर वाढण्याची शक्यता आहे.
ही प्रणाली फक्त दोन तासांत पूर्ण चार्ज होते आणि पूर्ण लोडवर १.५ तासांपर्यंत बॅकअप देते. ‘ओला शक्ती’ १२० व्होल्ट ते २९० व्होल्ट या विस्तृत व्होल्टेज श्रेणीचे व्यवस्थापन करते, ज्यामुळे घरगुती उपकरणांना व्होल्टेज चढउतारांपासून संरक्षण मिळते. यात IP67 प्रमाणित वेदरप्रूफ बॅटरी आहे, त्यामुळे ही प्रणाली धूळ, पाणी आणि पावसाळ्यातील परिस्थितींमध्येही सुरक्षित राहते.
लाँचिंग कार्यक्रमात ओलाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भाविश अग्रवाल म्हणाले, “ओला शक्तीमुळे वैयक्तिक ऊर्जेच्या वापरात क्रांती घडणार आहे. हे एकाच उत्पादनात पॉवर बॅकअप, सौरऊर्जेची साठवणूक आणि व्होल्टेज स्थिरीकरणाची सुविधा देते. त्याची देखभाल अतिशय कमी असून वापरण्यास सोपी आहे.”
‘ओला शक्ती’ पारंपरिक इन्व्हर्टरपेक्षा तांत्रिकदृष्ट्या वेगळी आहे. सामान्य इन्व्हर्टर बॅटरी फक्त डीसीला एसीमध्ये रूपांतरित करून वीजपुरवठा करतात, तर ओला शक्ती ही एक संपूर्ण ऊर्जा साठवणूक प्रणाली आहे. ती वीज साठवते, सौरऊर्जा वापरासाठी सक्षम आहे, व्होल्टेज स्थिर ठेवते आणि पोर्टेबल वापरासाठीदेखील उपयुक्त आहे.
इन्व्हर्टरप्रमाणे यासाठी वेगळी बॅटरी किंवा वारंवार देखभालीची गरज नाही. त्यामुळे ती घरगुती वापरकर्त्यांसाठी दीर्घकालीन, स्वच्छ आणि कार्यक्षम ऊर्जा उपाय ठरू शकते. ओलाच्या या नवीन उपक्रमामुळे भारतीय ऊर्जा क्षेत्रात ‘वैयक्तिक पॉवर इंडिपेन्डन्स’चा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule