हिंगोली येथे “जागर संविधानाचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने “जागर संविधानाचा” या दोन दिवसीय जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री
हिंगोली येथे “जागर संविधानाचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


हिंगोली, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने “जागर संविधानाचा” या दोन दिवसीय जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या कल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १८ व १९ ऑक्टोबरदरम्यान शिवाजीराव देशमुख सभागृह, हिंगोली येथे होणार आहे.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय संविधान निर्मितीस २ वर्षे, ११ महिने आणि १७ दिवस इतका कालावधी लागला होता. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद तर प्रारुप समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मानवी मूल्यांचे रक्षण करणारे हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आले. या ऐतिहासिक घटनेस ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी संविधानावर आधारित शाहिरी, पोवाडा, गीत, कवने अशा विविध कलाप्रकारांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मुंबई येथील गायक अशोक निकाळजे व संच तसेच हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक गायक दिनकर लोणकर व संच संविधान विषयावर आधारित सादरीकरण करतील.

रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी संविधानावर आधारित एक प्रेरणादायी महानाट्य सादर होणार आहे. या महानाट्याचे लेखन व दिग्दर्शन वैभव महाडिक यांनी केले असून शाहिरी, गीत आणि संवाद अशा बहुआयामी कलारूपात हे नाट्य सादर होईल.

हिंगोली येथे होऊ घातलेल्या संविधान अमृत महोत्सवी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी कलाकारांच्या सादरीकरणातून भारतीय संविधानातील लोकशाही मूल्यांचा जागर होणार असून, कला रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमांचा नक्कीच लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande