पुणे, 17 ऑक्टोबर (हिं.स.)
राज्यातील यंदाच्या रब्बी हंगामात सुमारे 65 लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांच्या पेरण्या अपेक्षित आहेत. सरासरी क्षेत्रापेक्षा सुमारे 10 लाख हेक्टरने वाढण्याचा अंदाज आहे. बि-बियाने, खते आदी निविष्ठाच्या उपलब्धतेचे नियोजन कृषी विभागाने केले असून हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व प्रयत्न कृषी विभागाकडून सुरु असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पुण्यातीळ वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत आज राज्याच्या रब्बी हंगाम नियोजनाच्या बैठकीसाठी ते आले होते.
राज्यात यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. खते आणि बियाण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही नियोजन केले आहे. युरिया खताची टंचाई जरी असली तरी केंद्र सरकारशी बोलून युरियाचे टंचाई दूर करण्याबाबत निर्णय केला जाईल. असेही भरणे म्हणाले .
यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, स्मार्ट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालक वर्षा लड्डा-उंटवाल यांच्यासह कृषी संचालक, राज्यातील विभागीय कृषी सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु