प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी ‘रिसायक्लोथॉन’ उपक्रमाचा शुभारंभ
नवी मुंबई, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। नवी मुंबई महानगरपालिकेने शाश्वत शहरी जीवनमान उंचाविण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. प्रोजेक्ट मुंबई आणि माइंडस्पेस बिझनेस पार्क आरईआयटी यांच्या सहकार्याने ‘नवी मुंबई प्लास्टिक अँड ई-वेस्ट रिसायक्लोथॉन’ हा अभिनव
T-shirt made from plastic


नवी मुंबई, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। नवी मुंबई महानगरपालिकेने शाश्वत शहरी जीवनमान उंचाविण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. प्रोजेक्ट मुंबई आणि माइंडस्पेस बिझनेस पार्क आरईआयटी यांच्या सहकार्याने ‘नवी मुंबई प्लास्टिक अँड ई-वेस्ट रिसायक्लोथॉन’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत २०० हून अधिक ठिकाणी २ लाखांहून अधिक नागरिकांना सहभागी करून प्लास्टिक व ई-कचऱ्याचे संकलन, पुनर्वापर आणि त्याचे सार्वजनिक उपयोगी साहित्यात रूपांतर करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे नो वेस्ट टू लँडफिल म्हणजेच क्षेपणभूमीवर शून्य कचरा नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी आणि माइंडस्पेस आरईआयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या उपक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. या वेळी प्लास्टिकपासून बनवलेल्या आकर्षक टी-शर्टचे अनावरणही करण्यात आले.

रिसायक्लोथॉनद्वारे गोळा झालेल्या प्लास्टिक आणि ई-कचऱ्यापासून बेंचेस, प्लांटर्स, वॉकिंग ट्रॅक आणि शालेय साहित्य तयार केले जाणार आहे. या माध्यमातून “रिड्यूस, रियूज, रीसायकल” हे थ्री-आर तत्व प्रत्यक्षात आणले जाणार आहे. झिरो वेस्ट गार्डन्सची निर्मिती हा या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असून पूर्णपणे रिसायकल केलेल्या कचऱ्यापासून शहरातील उद्याने सजविण्यात येतील.

या वर्षभरात विविध जनजागृती मोहिमा, किनारपट्टी स्वच्छता आणि प्लास्टिक संकलन उपक्रम हाती घेतले जातील. माइंडस्पेसच्या ऐरोली येथील पार्कमधील कर्मचारी, विद्यार्थी आणि स्वयंसेवक यामध्ये सहभागी होणार आहेत.

डॉ. शिंदे यांनी सांगितले की, “प्रोजेक्ट मुंबई आणि माइंडस्पेस आरईआयटी यांच्या सहकार्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम नवी मुंबईला प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्यात मोलाचा ठरेल.”

शिशिर जोशी यांनी सांगितले की, “हा उपक्रम कचऱ्याचे संधीत रूपांतर करून नागरिकांच्या सहभागातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरेल.” तर रमेश नायर यांनी म्हटले की, “नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात व्यवसाय करताना पर्यावरणासाठी योगदान देणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये नवी मुंबईला सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळाले असून ‘रिसायक्लोथॉन’ हा उपक्रम शहराला शाश्वत आणि स्वच्छ भविष्याच्या दिशेने नेणारे सकारात्मक पाऊल ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande