अमरावती, 17 ऑक्टोबर (हिं.स.)
राज्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने सामाजिक उत्तरदायित्वाचे उदाहरण घालून दिले आहे. समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांना सुपूर्द करण्यात आला.
या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार हा निधी देण्यात आला. या वेळी जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे, माजी आमदार विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, डॉ. राजीव ठाकूर, सभापती हरीश मोरे, उपसभापती भैय्यासाहेब निर्मळ तसेच संचालक मंडळातील प्रकाश काळबांडे, किशोर चांगोले यांच्यासह बाजार समितीचे अनेक कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगारही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. हा निधी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात आला.या सहकार्यामुळे राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना थोडासा आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा प्रयत्नांची गरज असून, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीने त्याचे उदाहरण प्रस्थापित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी