सोलापूर, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)।
सोलापूर जिल्ह्याने गो-संवर्धनामध्ये मोठे काम केले आहे. जिल्ह्यातील ४२ गोशाळांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २ हजार गायी व वासरांना जीवदान मिळाले आहे. शहरातून आणि जिल्ह्यातून भटक्या गायींची संख्या वाढत असतानाच, पकडलेल्या वासरांचे जगण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. यामुळे गो-संवर्धनाचे काम आव्हानात्मक बनले आहे.
आज वसुबारसच्या निमित्ताने शहर व जिल्ह्यातील प्रत्येक गोशाळेत गायी व वासराचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र, केवळ सण साजरा न करता, प्रत्येक कुटुंबाने शक्य असल्यास गायपालन करावे किंवा निदान गोशाळांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करावे असे आवाहन गोप्रेमींनी केले आहे.गोशाळा चालवण्याचा खर्च व मनुष्यबळाचा ताण मोठा असल्याने गोशाळा चालकांची मोठी अडचण होत आहे. ५० टक्क्यांहून अधिक गोशाळा केवळ देणगीदारांच्या मदतीने सुरू आहेत. अनेक गोशाळा केवळ देणगीदारांच्या मदतीने तग धरून आहेत. गोधन वाचविल्यानंतर यामधील वासरू वाचवण्याचे प्रमाण सुधारण्यासाठी व गोशाळांना आर्थिक बळ देण्यासाठी शासनाने नियमित अनुदान देणे गरजेचे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड