अमरावती, 17 ऑक्टोबर (हिं.स.)
अमरावती महानगरपालिका तर्फे आयोजित “दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन” या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आज सांस्कृतिक भवन, अमरावती येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटन सोहळ्याला शहरातील मान्यवर, अधिकारी, कलाकार, छायाचित्रकार, महिला बचत गट प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन आणि गणेशवंदना करून उद्घाटन मा. आमदार सौ. सुलभाताई खोडके व महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सांस्कृतिक भवन दिव्य रोषणाईने सजविण्यात आले असून, दिवाळीच्या स्वागताचा सोहळा शहरातील नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.
या प्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की, “महानगरपालिकेने राबविलेला हा उपक्रम शहराच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे. यातून कलाकार, महिला बचत गट आणि लघुउद्योजकांना प्रोत्साहन मिळत आहे.”
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “‘दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून, शहरातील सर्जनशीलतेचा आणि सामूहिक ऐक्याचा उत्सव आहे. फोटोग्राफी प्रदर्शनातून अमरावतीचे सौंदर्य आणि सामाजिक जीवनाचे विविध पैलू सुंदररीत्या मांडले गेले आहेत.”
या महोत्सवात लोककला, नृत्य, संगीत, बचत गटांची उत्पादने आणि स्थानिक उद्योजकांचे स्टॉल आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. तसेच ‘स्वच्छ अमरावती’ मोहिमेअंतर्गत RRR सेंटर उपक्रमाची माहितीही नागरिकांना देण्यात आली.
१६ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार असून, सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. या उपक्रमामुळे अमरावतीच्या संस्कृतीला नवा साज चढला असून, दिवाळीचा उत्सव सामाजिक ऐक्य आणि सर्जनशीलतेचा दीप प्रज्वलित करणारा ठरला आहे.
या महोत्सवाला उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी