सोलापूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।
शून्य ते 18 वयोगटाच्या आतील सर्वच लहान मुलांवर यापुढील काळात मोठ्या स्वरूपाचे व खर्चीक उपचाराच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी केंद्रासह राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) ही योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजनेतंर्गत मोठ्या शहरातील नामवंत रुग्णालयात उपचाराची सोय करण्यात आली आहे. यामुळे लहान मुलांवरील महागडा उपचारही नामवंत आरोग्य संस्थेत मिळणार आहे. या उपचारासाठी पालकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही.राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने नुकताच काही हॉस्पिटलसोबत या योजनेसाठी करार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खासगी नामवंत आरोग्य संस्थेमध्ये लाखो रुपये खर्च येतो. मात्र, या योजनेत मुलांच्या पालकांना ती खर्च करण्याची गरज पडणार नाही. या करारानुसार शून्य ते 18 वयोगटातील मुलांवर पुढील खर्चीक उपचार मोफत करता येणार आहेत. उपचार पूर्ण झाल्यावर त्याचे संपूर्ण बिल राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गंत ठरवलेल्या दरांनुसार संबंधित रुग्णालयांना दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या बिल राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम योजनेचे संबंधित डॉक्टर किंवा जिल्हा रुग्णालयात चौकशी करावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड