पुणे, 17 ऑक्टोबर, (हिं.स.)संत महात्म्यांच्या नावाने वेगवेगळ्या समाजाची आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून हे सरकार जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करीत आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केला.
पिंपरी, पुणे येथे महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ व मायक्रो ओबीसी, अलुतेदार, बलूतेदार, विमुक्त, भटके समाजाच्या जिल्हा प्रतिनिधींची महाराष्ट्र प्रदेश बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निमंत्रक व महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव गुरव, प्रदेश कार्याध्यक्ष सतीश दरेकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत गवळी, शशिकांत आमने, मुकुंद मेटकर, किशोर सूर्यवंशी, सतीश कसबे, चंद्रकांत कापडे, बाळासाहेब शेलार, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अभिमन्यू दहितुले तसेच राज्यभरातून आलेले जिल्हा व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी दळे म्हणाले की, ओबीसी समाजातील आरक्षित असणाऱ्या राजकीय जागा, शैक्षणिक सुविधा, नोकरी व व्यावसायिक कर्ज, अनुदान सुविधांचा लाभ माळी, धनगर व वंजारी समाजाने मोठ्या प्रमाणात घेतला आहे. या लाभापासून ओबीसी, ओबीसी प्रवर्गातील मायक्रो ओबीसी, बलुतेदार, अलुतेदार, एसबीसी, भटके, विमुक्त समाज अद्यापही वंचित आहे. या वंचितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी रोहिणी व आयोगाची अंमलबजावणी करून न्याय दिला पाहिजे. हे सरकार नव्याने स्थापन झालेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी, कार्यालय आणि कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देत आहे. परंतु ओबीसी समाज आर्थिक विकास महामंडळ तसेच इतर समाजासाठी स्थापन केलेल्या आर्थिक विकास महामंडळांना साधा उप कंपनीचा दर्जा देऊन निधी व कार्यालय देखील उपलब्ध करून दिले जात नाही हा अन्याय दूर झाला पाहिजे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु